व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जयवंत शुगर्सची डिस्टीलरी ठरली राज्यात सर्वोत्कृष्ट

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला जाहीर करण्यात आला आहे. साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली. जयवंत शुगर्सने सन 2021-22 या गळीत हंगामात उत्कृष्टपणे कामगिरी केली आहे.

संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयवंत शुगर्सच्या डिस्टीलरी प्रकल्पाची दैनंदिन उत्पादन क्षमता 45 हजार लिटर प्रतिदिन आहे. प्रकल्पातील इन्सिनरेशन बॉयलर यशस्वीपणे कार्यरत असून, वार्षिक क्षमता वापर निर्देशांक 120.47% आहे. कारखान्याने ऊसाच्या सिरपपासून आणि बी-हेवी मळीपासून 2020-21 व 2021-22 या दोन वर्षात 2 कोटी 65 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. याशिवाय फर्मेंटेंड वॉशमधील अल्कोहोलचे प्रमाण सिरप रूटला 14% आणि बी-हेवी मळी रुटला 12.75% इतके आहे. अत्यंत उत्तमपणे सुरू असलेल्या या डिस्टलरीच्या नफ्यातून ऊसउत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 109 रुपये प्रतिटन अतिरिक्त ऊसाचा दर देणे शक्य झाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, व्ही.एस.आय.ने जयवंत शुगर्सला कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी पुरस्कार जाहीर केला आहे. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे केले जाणार आहे.