औरंगाबाद : शहरात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णचा आलेख वाढत आहे. सद्य स्थितीत कोरोनाचे 3515 रुग्ण दाखल आहेत.पंधरा दिवसात कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2 टक्यावरून आता थेट 17 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे शहराला कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे.
गेल्या काही दिवसात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत दररोज दोनशेपेक्षा अधिक रुग्ण बाधित आढळून येत होते. मार्चच्या दोन तारखेपासून हा आकडा ३०० वर गेला आहे. आता थेट 500 रुग्ण आढळत आहे. गेल्या दोन दिवसातच एक हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले. शहरात कोरोना संसर्ग हा घराघरात पोहचला आहे.
घरातील एक सदस्य बाधित आढळून आल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली तर ते देखील बाधित निघत असल्याचे आढळून आले आहे. दररोज साधारणपणे आरटीपीसीआर आणि रॅपिड अॅण्टिजेनच्या दोन हजारापेक्षा अधिक चाचण्या होत आहे. रॅपिड अॅण्टिजेन चाचणीतून ८० ते ९० बाधित रुग्ण आढळून येत असून आरटीपीसीआर चाचणीतून २०० ते २२० बाधित रुग्ण निघत आहे. बाधित रुग्ण निघण्याचा रेट हा पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. परंतु पंधराच दिवसात पॉझिटिव्ह रेट पहिले 10 अन् आता 17 टक्क्यांवर पोहोचला आहे. अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
रेट वाढल्याने कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी सात कोविड केअर सेंटरसह ४० खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा