औरंगाबाद- धुळे महामार्गावर कन्नड ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या औट्रम घाट सध्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरळीत होण्याची शक्यता नाही. परंतु 15 सप्टेंबर नंतर कार दुचाकी व इतर हलकी वाहने घाटातून जाऊ शकतील, असे प्रयत्न नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया करीत आहे. या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक सध्या नांदगाव मार्गे वळविण्यात आली आहे. भोपाळ येथून अभियंत्यांचे पथक औरंगाबादेत येणार असून ते घाटातील भिंत उभारण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्ला देणार आहेत. त्यानंतर घाट पूर्ववत करण्यासाठी सुरू असलेल्या कामाला वेग येईल. काल प्रकल्प संचालक अरविंद काळे व अभियंत्यांनी घाटात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 वरील औरंगाबाद ते धुळे महामार्गावर असलेल्या कन्नड चाळीसगाव दरम्यान औट्रम घाटत 31 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली. तेव्हापासून घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी 2017 च्या पावसाळ्यात झालेल्या 70 मी.मी. पावसाच्या तडाख्याने घाटातील साडे तीन मीटर पर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली होती. त्यानंतर 2018, 2019 आणि 2020 मध्ये ही कमी अधिक प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु या वर्षी तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले आहे.
प्रकल्प संचालकांनी सांगितले की, सध्या तरी कार व दुचाकी ची वाहतूक सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घाट दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून पुढील काही दिवस पाऊस सुरू राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत घाटातील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होईल असे आईचे प्रयत्न आहेत. सीडीवर चे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत करणे शक्य होणार आहे. बुधवारी भोपाळचे तज्ञ घाटात येणार असून, घाटात 25 मीटर उंचीची भिंत बांधावी लागणार आहे. त्याचे डिझाईन कसे असेल भिंत कशी बांधावी लागेल याबाबत ते तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर काम आणखी गतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्याचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी दिली.