औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात लागु असलेली नऊ दिवसाची संचारबंदी उद्या समाप्त होणार आहे.मात्र जिंसीतील कटकटगेट,रहेमानिया कॉलोनी, नेहरूनगर सह अनेक आतील भागात मटण, किराणा दुकान, चप्पल, फळ-भाजीपाला, चहा हॉटेल, मिठाई दुकाने अशी सर्वच दुकाने सुरू असून एक दिवस अगोदरच या भागातील संचारबंदी उठविण्यात अली आहे की काय असा प्रश्न हे दृश्य पाहून प्रत्येकाला पडत आहे.
शहरात 10 ते 18 जुलै दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.या संचारबंदीचा आजचा शेवटचा दिवस आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही कडक स्वरूपाची संचारबंदी आहे.मात्र या संचारबंदीतून शहरातील काही भाग वगळले की काय असा प्रत्यय आज नेहरूनगर, रहेमानिया कॉलोनी,कटकट गेट व परिसरात आला.या मधील बहुतांश भाग जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त आहे. या भागातील प्रत्येक गल्लीच्या चौकात पोलीस उभे आहेत. मात्र आत शेकडो नागरिक मुक्त संचार करीत आहेत.
या नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचे भान नाही. ठिकठिकाणी नागरिकांचे घोळके भाजीपाला, मटण, घेण्यासाठी प्रत्येक दुकानावर गर्दी, तर हातात पिशवी घेऊन सिगारेट, गुटखा, तंबाखू विकणारे सहज नजरेस पडत आहेत. ना विकणाऱ्या च्या तोंडाला मास्क ना ग्राहकांच्या, संचारबंदीच्या काळात अशा प्रकारे काही भागात मुक्त संचार होणे म्हणजे एक प्रकारे हे समूह संसर्गाला आमंत्रणच आहे.
संचारबंदी लागू असताना एवढे सर्व काही सामान्य जर होत असेल आणि चारी बाजूने वेढा घालून बसलेले पोलीस या नागरिकांना साधे घरात बसण्याचे आवाहन देखील करत नसतील तर आठ दिवस कामगार, व्यापारी, उधोजक, सह गोरगरिबांचा व्यवसाय ठप्प करून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य होईल का? कोरिणाची साखळी खऱ्या अर्थाने तोडायची असेल तर प्रशासनाच्या आदेशाला आवाहनाला केराची टोपली दाखविणाऱ्या अशा भागातील नागरिकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे झाले आहे.तरच संचारबंदी बंदीचा उद्देह साध्य होईल अन्यथा संचारबंदीत अशाच प्रकारे मुक्त संचार आणी विक्री सुरू राहिली तर शेकडो लॉक डाऊन करून देखील संक्रमणाची साखळी तोडणे शक्य होणार नाही.