औरंगाबाद । कोरोना रुग्णांमधील नैराश्याची भावना दूर करण्यासाठी महापालिकेने अनोखे पाऊल उचलले आहे. कोरोना रुग्णांच्या समुपदेशनासाठी आता मनोमित्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष उद्या बुधवारपासून 26मे कार्यान्वित होणार आहे. कोरोना रुग्ण भरती झाल्यापासून त्याला एक महिन्यापर्यंत मोफत समुपदेशनचा लाभ घेता येणार आहे. कोरोना ची लागण झाल्यावर संबंधित व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटल किंवा कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाते.
उपचाराच्या काळात रुग्णांना बऱ्याच वेळा मनात नैराश्याची भावना निर्माण होते. तणाव येतो भीती वाटते. अति विचार केल्यामुळे मेंदूवर ताण येतो. अशा अनेक प्रकारच्या समस्यांना त्या रुग्णास सामोरे जावे लागते. या परिस्थितीत त्या रुग्णाला भावनिक आधाराची गरज असते. त्याच्या मनात सुरू असलेले विचार समजून घेण्याची गरज असते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महापालिकेने समुपदेशन कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कक्ष 26 मे पासून सुरू केला जाणार आहे. डॉ कल्पना मोटे या कक्षाच्या समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
सायकॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ संदीप शिरसोदे, पंख फाउंडेशनच्या डॉ मधुरा अन्वीकर, माजी नगरसेविका अँड माधुरी अदवंत यांच्या पुढाकाराने 25 ते 30 समुपदेशकांची यादी महापालिकेला प्राप्त झाली आहे. हे सर्वजण हेल्पलाईनच्या माध्यमातून कोरोना रुग्णाचे मोफत समुपदेशन करणार आहेत.