औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिकेची हद्द वाळुज पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून जोर धरत होती. आता या प्रक्रियेला गती प्राप्त झाली असून सिडको प्रशासनाकडून प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत आहे. हस्तांतरणापूर्वी विविध शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांची एक समिती स्थापन करण्यात येणार असून समितीच्या अंतिम अहवालावरून हस्तांतरणाची प्रक्रिया राज्य शासनाच्या आदेशानुसार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरालगत असलेले वाळूज पंढरपूर परिसर महानगरपालिकेच्या क्षेत्रात घेण्यात यावा यासाठी सर्वात आधी क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. वाळुज परिसराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आजघडीला जवळपास चार ते पाच लाखांपर्यंत या भागाची लोकसंख्या पोहोचली आहे. या परिसरात टोलेजंग इमारती, रो हाऊसेस उभे राहत आहेत. या परिसराला सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे मनपाने हा परिसर आपल्या हद्दीत घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम फेब्रुवारी महिन्यातच महानगर पालिकेने सुरू केले होते. त्यानंतर मात्र कोरोना च्या दुसऱ्या लाटेमुळे या प्रस्तावाला ब्रेक लागला. परंतु आता कोरोना चा प्रादुर्भाव कमी होताच प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
खालील गावे येणार मनपा हद्दीत –
जर मनपाची हद्द वाळूज पंढरपूर परिसरापर्यंत वाढली तर मनपा हद्दीत गोलवाडी, तिसगाव, पंढरपूर, वाळूज, वाळूज एमआयडीसी, वाळूज महानगर 1, महानगर 2, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी तसेच पिसादेवी, गोपाळपूर हा परिसर औरंगाबाद मनपा क्षेत्रात घेण्याचा विचार सुरू आहे. कोणती गावे मनपा हद्दीत घ्यावी यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. सिडको तसेच ग्रामपंचायतीकडून या गावांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत याचा आढावा घेण्यात येणार आहे.