औरंगाबाद – देशभर राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिकेने देशात 22 वा तर महाराष्ट्रात 6 वा क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शहरामध्ये राष्ट्रीय स्तरावर 22 वा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षाच्या रॅकिंगमध्ये औरंगाबाद शहराचा क्रमांक 26 होता, तर देश पातळीवर शहराचा क्रमांक 88 होता. तो सुधारून स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये एकूण 59 झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 हे 6000 गुणाचे सर्वेक्षण होते. त्यामध्ये सर्विस लेव्हल प्रोग्राम, स्थळ पाहणी व नागरिकांचे अभिप्राय या गोष्टीची तपासणी करण्यात आली.
याच बरोबर या वर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रेरक दौरा सन्मान या पुरस्काराच्या प्रकारांमध्ये शहराला गोल्ड नामांकन प्राप्त झाले आहे गोल्ड हे नामांकन प्लॅटिनम या नामांकन नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नामांकन आहे. महाराष्ट्रात इतर गोल्ड नामांकन मिळणारी मोठी शहरे पुणे, नागपूर व नाशिक ही आहेत, असे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले.