औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता तारखेवर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना नोंदणी करता यावी, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील मतदारांच्या जुन्या यादीतील नावे, फोटोतील दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यादीत नाव नसणारे आणि नवीन मतदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी केंद्राकडे धाव घ्यावी लागणार आहे.
09 वॉर्डात नोंदणी सहाय्यता कक्ष
महापालिकेच्या क्षेत्रातील 9 वॉर्डांमध्ये मतदार यादीतील दुरुस्त्यांकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदार यादीतील त्रुटी दुरुस्तीसाठी केंद्र स्तरीय अधिकारी, पालिकेचे 315 कर्मचारी हे दुबारनोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी व त्रुटी असलेली नावे दुरुस्त करतील. 13, 14,15 नोव्हेंबर तसेच 27,28 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी नव मतदारांनी पुढाकार घ्यावा. तसेच 01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी आणि महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले आहे.
नोंदणीसाठी कुठे आहेत सुविधा?
महापालिकेतील मतदाराला मतदार नोंदणी सुलक्ष करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करता येईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रात, ग्राहक सेवा केंद्रात नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक नोंदणी अधिकारी, तथा तहसीलदार कार्यालयात ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे.