औरंगाबाद – औरंगाबादहून भरधाव वेगात मुरमुरे घेऊन बीडकडे जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह मुरमुरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) जवळ घडली असुन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिक माहिती अशी, औरंगाबादहून मुरमुरे घेऊन कंटेनर भरधाव वेगात बीडकडे जात असताना बुधवारी पहाटे औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव (जावळे) जवळ अचानक त्याने पेट घेतला. कंटेनरमधून आगीचे लोण उठत असल्याचे चालकाला आरशात दिसताच चालकाने प्रंसगावधान राखत तातडीने बाहेर उडी घेत सोबतच्या क्लिनरला झोपेतून उठवत त्याला बाहेर पडण्यास सांगितले व कंटेनर मुख्य रस्त्याच्या बाजूला घेऊन चालकाने पाचोड पोलिसांसह अग्निशामक दलाला मोबाईलवरून माहीती दिली.
पहाटे पाच वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना रस्त्यावर कंटेनर जळत असल्याचे दिसताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोच औरंगाबाद येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब व पाचोड पोलीस घटनास्थळी आले. तोपर्यंत कंटेनर व त्यातील मुरमुरे जळुन पूर्णतः जळुन खाक झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर अग्निशामक दलास अधिकारी व कर्मचाऱ्यांना आग विझवण्यास यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने चालकाने सुटकेचा निःश्वास घेतला. या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण करीत आहेत.