औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु लसीचा तुटवडा असल्यामुळे काही काळ लसीकरण बंद करण्यात येते. त्यामुळे जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा नागरिकांची प्रचंड प्रमाणात आरोग्य केंद्रावर गर्दी बघायला मिळते.
मंगळवारी महापालिकेला 7 हजार 500 लस देण्यात आले होते. यानंतर बुधवारी शहरात 39 केंद्रावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून मंगळवारी या लसी देण्यात आल्या होत्या.
बुधवारी दिवसभरात 6 हजार 702 लसी संपल्या होत्या. महापालिकेकडे आता फक्त 800 डोस शिल्लक असून गुरुवारी सर्व लसीकरण केंद्रे बंद असणार आहे त्याचबरोबर फक्त प्रोझोन मॉल परिसरात लसीकरण मोहीम सुरू राहील अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या मुबलक लसीच्या साठ्याची मागणी अजूनही पूर्ण झालेली नसून बुधवारी नागरिकांना नऊ ते दहा या वेळेमध्ये कुपन देऊन दहा वाजता लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.