औरंगाबाद प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावावरून औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिलेला असताना शिवसेनेने मात्र अभद्र आघाडी करून मुख्यमंत्री बनविला, असा चिमटा भाजप नगरसेवकांनी काढताच आम्हाला संस्कार शिकवू नका, असे सांगत शिवसेनेने भाजपवर प्रतिहल्ला केला. मात्र जनता आम्हाला जाब विचारते अस सांगत उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर औरंगाबादेत सेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. मात्र भाजपने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र आसन व्यवस्था करून शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित केली होती.
यावेळी शिवसेनेचे सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. दरम्यान भाजपचे उपमहापौर विजय औताडे हे नगरसेवकांमध्ये येउन बसले. त्यावर शिवसेनेचे सदस्य त्र्यंबक तुपे यांनी सभागृहाचे काही प्रोटोकॉल आहेत. उपमहापौरांनी डायसवरून खाली बसणे योग्य नाही.याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी अशी मागणी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला आणि यावरूनच औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.