औरंगाबाद – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केलेले एक ट्विट शहरात प्रचंड व्हायरल झाले आहे. ‘लवकरच ऐतिहासिक शहरासाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा’ असे ट्विट मंत्री डॉ. कराड यांनी केले आहे. यात त्यांनी ऐतिहासिक देवगिरी किल्ला दाखवला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. यामुळे मंत्री कराड आता शहरासाठी कोणती नवी घोषणा करण्यात येणार याची उत्सुकता औरंगाबादकरांना लागली आहे.
लवकरच ऐतिहासिक निर्णयाची घोषणा !
Stay tune #DrkaradUpdates pic.twitter.com/U8W18yQfAE— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) January 12, 2022
मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या ट्विटने सोशल मीडियात आता शहरासाठी नवीन काय घोषणा होणार याची चर्चा रंगली आहे. कोणी शहराच्या नामकरणाबद्दल तर कोणी विमानतळ विस्ताराबद्दल अंदाज बांधला आहे. भागवत कराड यांची मंत्री पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी शहराच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला मिळणारा निधी, पाणी प्रश्न, विमान-रेल्वे सेवेत वाढ, मेट्रो प्रोजेक्ट, वाहतूक प्रश्न यात त्यांनी मुख्तः काम सुरु केल्याचे दिसत आहे. तसेच स्मार्ट सिटीमधून बरेच प्रोजेक्ट सुरु आहेत. यामुळे आता शहराच्या विकासात भर टाकणारा आणखी एखादा प्रोजेक्ट येणार की शहर नामांतरावर काही घोषणा होणार याची उत्सुकता शहरवासियांना आहे.
मेट्रोसाठीच्या निधीची होऊ शकते घोषणा ?
शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याने केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी थेट वाळूज ते शेंद्रा असा एकच उड्डाणपूल असावा यासाठी पुढाकार घेतला आहे. यासोबत शहरात मेट्रो प्रोजेक्टसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारीच वाळूज ते शेंद्रा डीएमआयसी मेट्रो डबल डेकर उड्डाणपुलावरून होणार असून त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना स्मार्ट सिटी लवकरच वर्क ऑर्डर देणार आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर निधीबाबत चर्चा करण्यासाठी डॉ. कराड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी, राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या भेटी घेणार आहेत.