औरंगाबाद : राष्ट्रीय स्तरावरील सायकल फॉर चेंज यांच्या अनोख्या स्पर्धेत औरंगाबादने स्मार्ट सिटी मध्ये समावेश झालेल्या देशभरातील शहरांमधून पहिल्या पंधरामध्ये स्थान पटकावले आहे मुख्य म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई व इंदूर सारख्या बड्या शहरांना मागे टाकत औरंगाबाद शहर पुढे आले आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनतर्फे सायकल फॉर चेंज चॅलेंजरचे आयोजन केले आहे. याअंतर्गत स्मार्ट सिटी मिशनचा यादीतील शहरांना सायकल ट्रॅक तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला होता. यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले 117 शहरांची नोंदणी केली होती. या शहरांनी कमीत कमी एक सायकल ट्रॅक प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात औरंगाबादने क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन हा सायकल ट्रॅक तयार केला.
सोबतच सिडको येथे सायकल ट्रॅक तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षकांनी क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन सायकल ट्रॅकचा विशेष उल्लेख करत पहिल्या शहरांमध्ये औरंगाबादचे नाव असल्याचे जाहीर केले. ही औरंगाबादकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे अस्तिक कुमार पाण्डेय यांनी समाधान व्यक्त केले.