औरंगाबाद | शहरातील तापमान चाळीशीपार गेले आहे. गुरुवारी शहरातील तापमान ४०.१ अंशांपर्यंत पोहोचले. एप्रिलच्या पहिल्या आठवाड्यातच तापमान चाळीशीपार गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. शहराच्या कमाल व किमान तापमानात एप्रिलच्या सुरुवातीपासून वाढ झाली. सातत्याने वाढ होत असलेल्या तापमानाचा पारा चाळीशीपार पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना ऊन्हाचे चटके बसले.
शहरात गुरुवारी सर्वाधिक ४०.१ तापमानाची नोंद झाली आहे. शहरातील किमान तापमान २२.६ अंश होते. चिकलठाणा वेधशाळेत तापमानाची ही नोंद करण्यात आली आहे. तापमान वाढत असल्याने सकाळपासून उन्हाचे चटके बसत आहेत. नऊनंतर उकाडा जाणवत असून, दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे. प्रचंड उकाडा जाणवत असल्याने अकरानंतर शहरातील बहुतांश रस्त्यावर शुकशुकाट असतो. सकाळी ११ ते चार वाजेदरम्यान उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे चटके अधिक तीव्रतेने जाणवत आहेत.
कोरोनामुळे सुरू असलेल्या निर्बंधामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी आहे. उन्हाचा परिणाम सकाळपासून दिसून येत आहे. सायंकाळनंतर ऊन कमी झाले तरी वातावरणातील उकाडा कायम राहतो आहे. मार्चपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली ३० ते ३५ अंशापर्यंत तापमान होते. मागील आठ दिवसांत तीव्रता वाढली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात अशाच प्रकारचे तापमान राहील त्यासह पुढे तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.