हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर MIM तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र या आंदोलनात काही आंदोलनकर्त्यानी चक्क औरंगजेबाचा फोटो झळकवल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा उपस्थित होते. मात्र यावेळी एक तरुण हातात औरंगजेबाचा फोटो घेऊन उपोषणाच्या ठिकाणी आला. त्यानंतर औरंगाबाद जिंदाबादच्या घोषणा सुरु झाल्या. औरंगजेबच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत याठिकाणी जल्लोष सुरु झाला. मात्र हा सर्व प्रकार आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला फोटोसह उपोषणास्थळून बाहेर काढून लावले.
या एकूण सर्व प्रकाराबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका सांगितली आहे. आपण या गोष्टीचे समर्थन करत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. कोणीतरी औरंगजेबचा फोटो घेऊन आलं होत पण आम्ही त्याला लगेच बाहेर काढलं. आमचं मिशन स्पष्ट आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. मला माहिती आहे की, कोणीतरी तो फोटो घेऊन इथे पाठवला आहे. परंतु मी त्या समर्थन करत नाही. आमचं आंदोलन फेल जाण्यासाठी कोणीतरी हा प्रकार केला आहे असं जलील यांनी म्हंटल.