हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अवधूत गुप्ते यांच्या ‘विश्वामित्र’ नव्याकोऱ्या अल्बममधील ‘विश्वामित्र’, ‘तुझ्या विना’ या श्रवणीय गाण्यांनंतर आता तिसरे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी गाण्याचे शीर्षक ‘दूर दूर’ असे असून या अल्बममधील हे तिसरे बहारदार गाणे आहे. ज्याची प्रतिक्षा चाहते करत आहेत. या गाण्याचा जबरदस्त टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून या टीझरने तरुण मंडळींचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते यांचे संगीत आणि बोल लाभलेल्या ‘दूर दूर’ या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे.
प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच आजूबाजूला ‘त्या’ खास व्यक्तीचा भास होतो. जी व्यक्ती त्याला सर्वांपेक्षा प्रिय असते. परंतु कधी कधी ‘त्या’ व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तीच आणि फक्त तीच सर्वत्र दिसू लागते. प्रेमातील हीच तळमळ या गाण्यातून अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केली आहे. अवधूत गुप्ते यांची खासियत या गाण्यातून दिसत असून उडत्या चालीचे हे गाणे विशेष करून तरुण मंडळींचे लक्ष वेधून घेणारे आहे. या गाण्याचे सादरीकरणही उल्लेखनीय पद्धतीने करण्यात आले आहे.
एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली असून येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘दूर दूर’ हे नवे गाणे प्रदर्शित होणार आहे. या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणाले कि, ‘जिव्हाळा, आठवणी, दुरावा, भास या सगळ्या गोष्टींचा माणूस प्रेमात अनुभव घेतो. हे सगळे अनुभव दाखवणारे ‘दूर दूर’ हे गाणे आहे. मनाला भावतील असे या गाण्याचे बोल आहेत. सर्वत्र तिचाच भास होत असल्याचे या गाण्यातून सांगण्यात येत आहे. जुन्या प्रेमाची आठवण करून देणारे, एकांतात ‘ती’ची आठवण करून देणार हे गाणे आहे. हे गाणे माझ्या दोस्तांना नक्कीच आवडेल’.