हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उत्तराखंडच्या (Uttarakhand) चमोली जिल्ह्यातील माना गावात शुक्रवारी हिमस्खलन झाल्याने ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रशासन, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) आणि बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. या भागामध्ये हवामान ठीक नसल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मात्र तरी देखील प्रशासनाधिकारी सर्व बाजूने प्रयत्न करत आहेत.
बचावकार्य वेगाने सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, हिमस्खलनाची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय केली. यानंतर ITBP आणि BRO च्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या त्या बर्फाखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. या भागातील अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे बचावकार्यास अडथळे निर्माण होत आहेत.
हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान तज्ञांच्या मते, राज्यातील उच्च पर्वतीय भागांत २० सेमीपर्यंत हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. बद्रीनाथ धाम, हनुमानचट्टी, मलारी आणि औली येथे जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, तर इतर भागांत पाऊस पडत आहे. जिल्हा उपजिल्हाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले की, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.
हिमस्खलनामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता
चमोली जिल्ह्यात यापूर्वीही हिमस्खलन आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. २०२१ मध्येही येथे मोठा पूर आला होता, ज्यात अनेकांचे प्राण गेले होते. सध्या प्रशासनाने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढे गरज भासल्यास हवाईदलाची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.




