अभिनास्पद ! सिल्लोडच्या कन्येची आसाम रायफल्स मध्ये निवड

औरंगाबाद – जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या अतिशय दुर्गम अशा डकला येथील तरुणी अफाट इच्छाशक्ती आणि अजोड मेहनतीच्या बळावर भारतीय सैन्यदलात भरती झाली आहे. आता ती आसाम रायफल्स या सैन्यदलाच्या शाखेत लवकरच रुजू होणार आहे. मागील वर्षी पुणे येथे झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत तिची निवड झाली होती. सध्या ती ईशान्य भारतातील नागालँड येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे.

सिल्लोड तालुक्यातील डकला येथील शिल्पा राजू फरकाडे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती भारतीय सैन्यदलात निवडली गेली आहे. शिल्पाचे प्राथमिक शिक्षण हळदा-डकला येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर तिने माध्यमिक शिक्षण पैठण तर उच्च माध्यमिक शिक्षण सिल्लोडमध्येच घेतले. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे संपूर्ण शिक्षण आणि जबाबदारी डकला येथील तिचे मामा प्रभू शामराव साखळे यांनी घेतली होती. त्यांनीच तिला भारतीय सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा दिली होती. प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने प्रथम मामा आणि आईचे आशीर्वाद घेतले.

2018 मध्ये शिल्पाने स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत सैन्य भरतीची जाहिरात पाहिली होती. तो अर्ज भरून तिने आसाम रायफल्य या सैन्यभरतीला प्रथम प्राधान्य दिले होते. सहा महिन्यांपूर्वी याचा निकाल लागला आणि तिची आसाम रायफल्समध्ये भरती झाली. त्यानंतर नागालँडमध्ये तिला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. प्रशिक्षण संपल्यानंतर गुरुवारी ती गावाकडे परतली. गावातील नागरिकांनी शिल्पाचे जोरदार स्वागत करून तिची वाजत-गाजत मिरवणूक काढली. 28 नोव्हेंबर रोजी ती नागालँडला रवाना होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून सैन्यात भरती होणारी शिल्पा ही पहिली युवती असून तिची मेहनत आणि ध्येय साध्य करण्याच्या इच्छाशक्तीमुळे तिने हे यश मिळवल्याची प्रतिक्रिया तिचे शिक्षक के. एन. सपकाळ यांनी दिली.