हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन गेल्या 9 दिवसांपासून
ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. यादरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन हे उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती केली होती. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी केला होता. अखेर आज सरकारने लक्ष्मण हाके यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी आम्ही लक्ष्मण हाकेंच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे सांगितलं. त्यानंतर आपले उपोषण स्थगित करत लक्ष्मण हाके म्हणाले की, “आमच्या मागण्या मान्य करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याने आम्ही आंदोलन तात्पुरते उपोषण मागे घेत आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु”
दरम्यान, सुरुवातीला मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये याला छगन भुजबळ यांनी सर्वात जास्त विरोध दर्शवला होता. त्यावेळी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर लक्ष्मण हाके मैदानात उतरले आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. लक्ष्मण हाके यांच्यावरही टीका करण्यास मनोज जरांगे अग्रस्थानी होते. परंतु आता स्वतः सरकारने लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.