विशेष प्रतिनिधी । अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज (बुधवार) सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले. मंगळवारी अयोध्या प्रकरणी सुनावणीचा ३९ वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील अशी आशा असल्याची माहिती हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी दिली. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा करण्यात येईल. तसंच बुधवारीच यावर चर्चा पूर्ण झाल्यास निकाल सुरक्षित ठेवला जाईल. परंतु या सर्व बाबी न्यायालयावर अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दोन्ही पक्षकारांना आज साडेतीन तासांची वेळ देण्यात येईल. तसंच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानतर सुनावणी पूर्ण होईल. दोन्ही पक्षकारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रत्येकी एक एक तास देण्यात येणार असून युक्तीवादासाठी दोन्ही पक्षांना प्रत्येकी ४५ मिनिटे देण्यात येणार आहेत.तसेच राम मंदिर प्रकरण संवेदनशील असल्यामुळे अयोध्येमध्ये १० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तर तब्बल २०० शाळा २ महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.