अयोध्या रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, राम मंदिर प्रतिकृतीप्रमाणे होणार पुनर्बांधणी

नवी दिल्ली । राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणं नव्या रुपात-ढंगात सजली आहेत. यात आता आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनची. अयोध्या रेल्वे स्थानकावर दररोज अनेक गाड्या चालवल्या जातात. आता अयोध्येत राम मंदिर बनणार आहे, तर अयोध्या स्थानकाचा देखील कायापालट होणार आहे. या रेल्व स्थानकाला राम मंदिराच्या धर्तीवरच पुन्हा डिझाइन केले जाणार आहे. जून 2021 पर्यंत स्थानकाचे काम पूर्ण होईल. यासाठी रेल्वे मंत्रालयानं निधीमध्येही भरघोस वाढही केली आहे.

प्रत्यक्ष राम मंदिर तयार होण्यापूर्वीच पुढील दोन वर्षात अयोध्यावासियांना मंदिराच्या प्रतिकृती स्वरुपात रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनच्या पुनर्विकासासाठी रेल्वेने बजेटमध्ये वाढ केली असून ८० कोटींवरुन ती १०४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.यासंदर्भात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी ट्विट केलं होतं. यात त्यांनी म्हटलं, “करोडो लोक राम मंदिराला भेट देण्यासाठी येतील. त्यामुळे रेल्वे मंत्रालयानं पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्या स्टेशनचा पुनर्विकास करण्याचं ठरवलं आहे.”

रेल्वे विभागाच्या वतीने अयोध्या रेल्वे स्थानक, प्रवासी सुविधा, स्वच्छता, सौंदर्य आणि वेगवेगळ्या अत्यावश्यक सुविधांच्या रूपात मोठा बदल करून रेल्व स्थानकाला नवीन मार्गाने सजवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन आणि आधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज अयोध्या स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात या स्थानकासाठी 80 कोटी रुपये मंजूर झाले होते, आता ती वाढवून 104 कोटी करण्यात आले आहे. स्थानकाची इमारत रेल्वेची (आरआयटीईएस) कंपनी तयार करत आहे.

अयोध्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2/3 मध्ये विकास कामे, विद्यमान परिसंचरण क्षेत्र आणि धारण क्षेत्र विकसित केले जाईल. दुसर्‍या टप्प्यात नवीन स्टेशन इमारत व इतर सुविधांचे बांधकाम केले जाईल. या सुविधा स्थानकाच्या आत आणि बाहेरील भागात दिल्या जातील. स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. याशिवाय तिकीट काउंटर, वेटिंग हॉल, वातानुकूलन 3 विश्रांती कक्ष, 17 बेडचे पुरुष वसतिगृह, 10 बेडची सुविधा असेलेले महिला वसतिगृह, अतिरिक्त फुट ओव्हर ब्रिज, फूड प्लाझा, दुकाने, अतिरिक्त शौचालय या सुविधांची संख्या वाढविण्याचे काम सुरु होणार आहे. पर्यटक केंद्र, टॅक्सी बूथ, चाईल्ड केअर सेंटर, व्हीआयपी लाऊंज, सभागृह आणि व्हीआयपी गेस्ट हाऊस या सुविधा स्टेशनवर दिल्या जाणार आहेत. अयोध्या रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न होत आहेत अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय त्रिपाठी यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like