हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक जवळ आली असताना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला (Congress) दुसरा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या राजीनामानंतर आता नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. नेते बाबा सिद्दीकी यांनी दिलेल्या तडकाफडकी राजनाम्यामुळे काँग्रेसला यायला मोठा धक्का बसला आहे.
नुकतीच बाबा सिद्दीकी यांनी X च्या आपल्या अधिकृत अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, पण या म्हणीप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या गेलेल्याच बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो”
दरम्यान, सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून बाबा सिद्दीकी अजित पवार गटात सामील होण्यासाठी हालचाली करत आहेत. त्यामुळे आता तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बाबा सिद्दीकी अजित पवार गटात सामील होतील असे म्हटले जात आहे. यापूर्वी माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी देखील पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आता त्यांच्या पाठोपाठ सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केले आहे. सिद्दीकी आता थेट अजित पवार गटात प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.