अमरावती प्रतिनिधी । ‘शेतकऱ्याचा ७/१२ कोरा कोरा’ पदयात्रेच्या माध्यमातून ‘प्रहार’चे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी चिरकुटा गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी राऊत व फुलवाडीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी दिनेश राठोड या दोघांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबियांसोबत चर्चा करीत त्यांचे सांत्वन केले. पुढे तूपटाकळी गावात शेतीच्या बांधावर जाऊन कोळपणी करीत बच्चू भाऊंनी शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधला.
शेतकऱ्यांप्रती मनामध्ये कायम तळमळ असणाऱ्या बच्चू कडू यांच्या ‘७/१२ कोरा कोरा’ पदयात्रेला शेतकऱ्याचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ नसून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी वेळ आहे. असला मुख्यमंत्री काय कामाचा, अशाला मुख्यमंत्री म्हणावं का? असा सवाल शेतकरीबांधव करू लागले आहेत.
बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आजचा सहावा दिवस असून बच्चू भाऊ शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. वृद्ध व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना ७/१२ कोरा कोरा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन देखील करीत आहेत.
अमरावती विभागात 257 तर यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत एकूण 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यामध्ये यवतमाळ 178 शेतकऱ्यांसह आघाडीवर आहे. मागील सहा महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकर्याची यादी पाहिल्यास यामध्ये सव्वाअधिक यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा – १०१, यवतमाळ जिल्हा – १७८, अकोला जिल्हा – ९०, बुलढाणा जिल्हा – ९१, वाशिम जिल्हा – ६७ या जिल्ह्याचा समावेश आहे.
सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या व जिल्हे
अमरावती जिल्हा : ५,४७७
यवतमाळ जिल्हा : ६,३५१
अकोला जिल्हा : ३,२०७
वाशिम जिल्हा : २,१०७
बुलढाणा जिल्हा : ४,५३२