13 आमदार लोक विसरले, केवळ भाषणाने…; नाव न घेता बच्चू कडूंची राज ठाकरेंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही जाती-पाती, धर्माच्या नावावर काहीही करत नाही. जात आणि धर्म लावला की पक्ष वाढतो. मनसेने मध्यंतरी सुरू केले होते. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. अरे बाबा तु कुठं हिंडतो का? निव्वळ बोलल्याने काहीही होत नाही. तरी लोकांनी 13 आमदार निवडून दिले होते. महाराष्ट्र आता ते 13 आमदार विसरून गेला. पण बच्चू कडू चारवेळा निवडून आला. तुमच्यासारख्या लोकांनी चारवेळा अपक्ष आमदार म्हणून मला निवडून दिले,” अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

अमरावती येथील संत कृपा क्रीडा मंडळाद्वारे एक कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. यावेळी बच्चू कडू यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात जेव्हा शिंदे सरकार आलं तेव्हा अनेकांनी मंत्रीपद मागितले. पण बच्चू कडूने थेट मंत्रालयच आणले. लोक म्हणतात गुवाहाटीला गेले. 50 खोके मिळाले. पण 50 खोके घरात मावतात का? असा सवाल कडू यांनी यावेळी केला.

मी कधीच जाती, धर्माचा झेंडा लावला नाही. सामान्यांना आपलं वाटल पाहिजे, हा आमचा माणूस आहे हे वाटलं पाहिजे. त्यावेळी लोक मतदान करताना जात पाहत नाही. मागील वीस वर्षात मंदीर, मशिदीचे वाद लावले नाही. ते लावले असते तर 10 आमदार निवडून आले असते, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.

फक्त facebook वर पोकळ…

यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना टोलाही लगावला. ते म्हणाले की,”निव्वळ फेसबूकवर येऊन पोकळी गोष्टी बोलून चालत नाही. उतरावं लागतं. घरी स्वंयपाक केला नाही आणि सांगितलं कोबीची भाजी चांगली झाली. पण ताटात कुठे आहे? कोबीची भाजी चांगली झाली ताटात आणावं लागेल ना. पोट भरलं पाहिजे ना. बोलबच्चन करुन थोडीच होतं. कर्म आणि कर्तव्य करावं लागतं त्यासाठी. धावावं लागतं, मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो. तसेच वेळ आली तर रक्त सांडण्याची तयारी ठेवावी लागते. हे बच्चू कडूने करून दाखवलं आहे,” अशा शब्दात कडू यांनी ठाकरे यांना फेसबूक लाईव्हच्या मुद्द्यावरुन टोला लगावला.