हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिव-शक्ती परिक्रमा पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांचा विचार करून भाजप-शिवसेना आणि इतर पक्षांकडून पंकजा मुंडे यांना युतीच्या ऑफर देण्यात येत आहेत. आता प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी देखील पंकजा मुंडे यांच्याशी युती करण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडली आहे. “आपण पंकजा मुंडे यांच्याशी युती करण्यासाठी सकारात्मक आहोत” असे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हणले आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
पंकजा मुंडे यांच्याशी युती करण्याच्या विचारावर आपली भूमिका मांडताना बच्चू कडू म्हणाले की, “युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पंकजाताई यांच्यात मोठी क्षमता आहे. यात मला काही शंका नाही. पंकजाताई यांच्यात किती क्षमता आहे, हे त्यांनी तपासून पहावं. स्वतःचे 10-15 आमदार असतील, तर मग आम्हीही पंकजाताई यांच्यासोबत युती करू, असं बच्चू कडू म्हणालेत. लोकं तुम्ही जमा केली. पण लोकांची कामंही करावी लागतात. त्यांनी मनावर घेतले, तर त्या करूही शकतात”
आता बच्चू कडू यांनी युती करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे त्यावर आता पंकजा मुंडे काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सध्या राज्यात पंकजा मुंडे यांचे शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू आहे. येत्या 11 सप्टेंबरपर्यंत ही परिक्रमा यात्रा सुरू राहील. 5 हजार किलोमीटरची ही पदयात्रा बारा जिल्ह्यातून केली जाईल. या पदयात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे आज त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर असा प्रवास करतील. तसेच या पदयात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधतील.
एकीकडे पंकजा मुंडे यांची पदयात्रा सुरू असताना दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पडला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील आपली भूमिका मांडली आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे मराठा हे कुणबी आहेत. हे सूर्याइतकं सत्य आहे.” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत असताना आगामी निवडणुकीत याचा काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.