हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) काय भूमिका घेतली यावर सर्वांचेच लक्ष लागून होते. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाकडे जाण्याचा मार्ग न निवडता शेतकरी, अपंग, दिन दुबळ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेला संघर्ष चालू ठेवला. अशातच आता बच्चू कडू यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन बच्चू कडू यांचा “वाडा मोर्चा” आज अमरावतीत आयुक्तांच्या कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव सहभागी होणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बच्चु भाऊ यांचा हा पहिला मोर्चा असणार आहे. कारण, गेल्या वर्षभरात पश्चिम विदर्भात 1151 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. परंतु याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. म्हणूनच या विरोधात बच्चू कडू तीव्र आंदोलन करणार आहेत.
दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, “आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्याच जास्त आहे. राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. मग तरीही हिंदू शेतकऱ्यांवर स्वत:ला संपवण्याची वेळ का येते?” तसेच, सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाटू शकते तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी का करू शकत नाही? असाही संवाद बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.