हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर येथील २ अल्पवयीन मुलींवर सफाई कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची घटना (Badlapur Crime) समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अक्षय शिंदे असं सदर नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मात्र आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अजूनही आंदोलन सुरु आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण सुद्धा तापलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि गृह विभागावर ताशेरे ओढल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनीही नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल आहे.
याबाबत राज ठाकरेंनी ट्विट करत म्हंटल, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना (Badlapur Crime) घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही.
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2024
मुळात हा महाराष्ट्राच्या…
आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. असं राज ठाकरेंनी म्हंटल.
महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र्र बंदची हाक – Badlapur Crime
दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की, बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासला आहे. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न केला आहे. हि संस्था भाजप आणि आरएसएसची असल्याने त्यांची बदनामी होऊ नये याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. महायुतीला या घटनेचं काहीही घेणंदेणं नसून सत्तेची गुर्मी त्यांच्यात आहे. आम्हाला यामध्ये राजकारण करायच नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू-फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळिमा लावायचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी कडून देण्यात आली आहे. या बंद मध्ये महाविकास आघाडी आणि आमचे सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहोत. राज्यातील सर्व शाळा, कॉलेज, मुलांचे पालक, दुकानदार, या सर्वानी या बंद मध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्रातील अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकाराला आरसा दाखवायचा प्रयत्न करू असं आवाहन नाना पटोले यांनी केलं.