विशेष प्रतिनिधी । अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा सांगणारे बॉलिवूडमधील ‘बाला’ आणि ‘उजडा चमन’ हे दोन हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसच्या आधी न्यायालयात आमने-सामने येणार आहेत. ‘उजडा चमन’चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी ‘बाला’च्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
‘बाला’मधील तब्बल १५ दृश्ये ‘उजडा चमन’मधील दृश्यांशी जुळणारी आहेत. याच कारणावरून कुमार पाठक हे न्यायालयात गेल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठक यांचा आरोप खरा ठरल्यास ‘बाला’च्या निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलावी लागणार आहे. आयुष्मान खुराणाची प्रमुख भूमिका असलेला ‘बाला’ चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर, ‘उजडा चमन’ ८ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत झळकणार आहे. यात सनी सिंग प्रमुख भूमिकेत आहे. दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून त्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, दोन्ही चित्रपट एकाच विषयाशी संबंधित असल्यानं आणि प्रदर्शनाच्या तारखा लागोपाठ असल्यानं प्रेक्षक खेचण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागणार आहे. ‘बाला’ याआधी १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी ही तारीख बदलून ७ नोव्हेंबर केली आहे. त्यावरूनच वादाला सुरुवात झाली आहे. आता ‘उजडा चमन’चे निर्माते न्यायालयात गेल्यानं या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाचा निर्णय तिथंच होणार आहे. या संदर्भात ‘बाला’चे निर्माते दिनेश विजान यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.