रस्ते अपघात विमा योजनेतून बाळासाहेब ठाकरेंचे नाव वगळले; शिवसेनेची आक्रमक भूमिका

balasaheb thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  रस्ते अपघात विमा योजना “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने”त विलीन करण्यात आल्यानंतर त्यामधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव वगळले गेले आहे. या योजनेच्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे यावर आक्षेप नोंदवत शिवसेना नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुन्हा योजनेत घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजने’ची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत ३० हजारांपर्यंत विविध ७४ उपचारांचा खर्च मोफत केला जाणार होता. मात्र काही कारणांमुळे गेल्या तीन वर्षात ही योजना लागू करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने या योजनेला ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये’ विलीन केले. सुधारित योजनेअंतर्गत जखमींना तब्बल १ लाखापर्यंतचा खर्च मोफत देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. तसेच या योजनेची लवकर अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आले.

मुख्य म्हणजे, गेल्या रविवारी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातींमध्ये रस्ते अपघात योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र या योजनेच्या जाहिरातीत कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच योजनेअंतर्गत त्यांचे नाव देखील संबोधण्यात आलेले नाहीत. या कारणामुळेच आता शिवसेनेने राज्य सरकार विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत याप्रकरणी राज्य सरकारवर टीका करत, राज्य सरकारचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे प्रेम बेगडी असल्याचे यामुळे स्पष्ट होते असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, “जी योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होती त्या योजनेचे स्वतंत्र अस्तित्व न टिकवता ती दुसऱ्या योजनेते समाविष्ट केली आणि ते करतानाही बाळासाहेबांचे नाव काढून टाकले हे संतापजनक असल्याचे देखील सावंत यांनी म्हणले आहे.

दरम्यान, रस्ते अपघात योजनेच्या जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळल्यानंतर शिवसेनेकडून याबाबत चौकशी करण्यात आली असल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी सलग दोन दिवस याप्रकरणी चौकशी करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र एका खाजगी सचिवाकडून सांगण्यात आले की, एकाच जाहिरातीत योजनेचा संपूर्ण मजकूर बसत नसल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव काढण्यात आले आहे. या सर्व प्रकरणानंतर आता शिवसेनेने पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव योजनेत टाकावे यासाठी शासनाकडे आग्रह धरला आहे.