कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आम्हांला सरदार पटेल यांच्याविषयी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी पत्र लिहीली होती. आज जे लोक पुतळे बनवत आहेत. आज ते विसरून गेले आहेत, सरदार पटेल आरएसएस संबधी काय म्हटले होते. ते म्हणाले होते, आरएसएसमधील लोक स्थानिक पातळीवर हिंसा करतात. देशाच्या विरोधात काम करतात. त्यामुळे आरएसएसवर बंदी आणण्याची ऑर्डर सरदार पटेल यांनी दिली होती, नेहरूंनी नाही. या देशात पीएफआयवर (PFI) बंदी येवू शकते, तर आरएसएस (RSS) वरती बंदी का घालू नये, असा सवाल ज्येष्ठ विचारवंत योगेंद्र यादव यांनी विचारला आहे.
नफरत छोडो, भारत जोडो या विचारांना बळ देण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत योगेंद्र यादव हे राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेचा विचार सर्वत्र पोहोचावा यासाठी योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ते नांदेड अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रा. धनाजी काटकर, झाकीर पठाण, रणजितसिंह देशमुख, पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर आदी उपस्थित होते.
योगेंद्र यादव म्हणाले, आमच्या घरातील हिंदू- मुस्लिम यांच्यात भांडणे लावतात, ते आमचे दोस्त की दुश्मन आहेत. या प्रकारचे काम करणाऱ्यांना मी देशविरोधी मानतो. मी भीता उघडपणे सांगतो आहे की, आरएसएसने गेल्या 70 वर्षात जे काही काम केले आहे ते देशद्रोहाचे आहे. यांचा विरोध विचाराने, संस्कृतीने, राजनितीने केला पाहिजे. केवळ कायद्याने बंदी किंवा यांचा प्रश्न सोडविण्यावर मी समाधानी नाही. त्यामुळे यांच्यासोबत रस्त्यावरील लढाई लढली पाहिजे.
चतुर्वर्ण व्यवस्था पुन्हा आणण्याचा प्रयत्न सुरू
आज जे हिंदूत्वाच्या नावावर राजकारण केले जात आहे, त्यांचा हिंदू धर्मांशी काही एक संबध नाही. तर चतुर्वर्ण व्यवस्था पुन्हा आणण्याचे काम सुरू आहे. दिल्लीत एक मंत्री शपथ घेते, जी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली आहे. त्यांचा विरोध भाजपा करते. आज लोकशाहीची चेष्टा केली जात आहे. महाराष्ट्रात पैशाने सरकार बनविले आहे, त्यामुळे लोकशाही धोक्यात असल्याचे येथे सांगण्याची गरज नाही. देशाला तोडण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. या संकटाचा सामना दुर्भाग्यामुळे संसद, कोर्ट, कचेरी यांच्याकडून होत नाही. त्यामुळे आता लोकांना रस्त्यावर यावे लागणार आहे, आणि हे काम आज भारत जोडो यात्रा करत आहे.