मुंबई । चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाला राज्य सरकारनं परवानगी दिलीय खरी, पण प्रत्येकाला नियमांच्या ‘चौकटी’मध्ये राहूनच काम करावं लागणार आहे. राज्य सरकारनं चित्रीकरणासाठी मार्गदर्शक सूचनांची यादीही जाहीर केली आहे. त्यात ६५हून अधिक वयोगटातील कलाकारांना चित्रीकरणाच्या सेटवर काम करता येणार नाही आहे. याचा फटका अनेक चित्रपटांच्या रखडलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणावर होणार आहे. प्रत्येक चित्रपटात वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका सादर करताना मोठ्या वयाच्या कलाकारांची कास्टिंग केली जाते. मात्र, हा नियम पाहता बरेच दिग्दर्शक सिनेमांच्या चित्रीकरणाला सुरुवात करूच शकत नाही आहेत. सध्या ६५ वर्षं वयाच्या मुद्यावर फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये बोलणी सुरू आहे. हा नियम शिथिल करण्याची मागणी डायरेक्टर्स असोसिएशनने राज्य सरकारकडे केली आहे. हा नियम शिथील केला जाणार का या मुद्द्याकडे सिनेसृष्टीचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चच्या मध्यापासून सर्व प्रकारची चित्रीकरणे थांबविण्यात आली होती. ६० दिवसांहून अधिक काळ लोटल्यामुळे चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानं कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असं असलं तरी नियम अटींचे सर्वांनाच पालन करायचे आहे.
चित्रीकरणाच्या सेटवर खाली दिलेले नियम पाळणं कलाकारांसाठी आवश्यक आहेत:
१)रंगभूषाकार आणि केशरचनाकारानं काम करताना मास्क आणि फेसशिल्डचा वापर करावा.
२)कलाकारांनी आपले माईक आणि लेपल माईक केवळ स्वतःसाठी वापरावे. दुसऱ्या कलाकारानं वापरलेल्या माइकचा वापर करू नये.
३)सेटवरील प्रत्येकानं आरोग्य सेतू ऍपचा वापर करणं आवश्यक.
४)स्वच्छतेची सर्व मार्गदर्शक तत्वं आणि आपत्कालीन क्रमांकाचा फलक सेटवर दर्शनी भागात असावा.
५)सेटवर चित्रीकरण सुरू असताना डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका पूर्ण वेळ असणं बंधनकारक.
६)सेटवर किमान तीन स्वच्छतागृह असणं आवश्यक. दर तासाला स्वच्छतागृहांचं निर्जंतुकीकरण होणं आवश्यक.
७)एक वैद्यकीय कर्मचारी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांच्या शरीराच्या तापमानाची आणि ऑक्सिजन पातळीची नोंद ठेवेल.
८)गर्भवती महिला कर्मचारी किंवा जर एखाद्या कर्मचाऱ्याची पत्नी गर्भवती असेल; अशा व्यक्तीला चित्रीकरणाच्या सेटवर काम करता येणार नाही (आगामी तीन महिन्यांसाठी)
९)६५ वर्षांहून अधिक वयाचे कलाकार, तंत्रज्ञ किंवा सिनेकर्मचारी यांना चित्रीकरण सेटवर येण्यास मनाई.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”