हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या सुट्टीमुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळत आहे. वांद्रे स्थानकात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तेथे ढकला ढकली सुरु झाली . त्यामुळे प्रवासी पडले त्यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले .या जखमी झालेल्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. हा घटनेमुळे मध्य रेल्वेने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
तिकिटांची विक्री थांबवण्याचा निर्णय
एका गाडीला उशीर झाला त्यामुळे ती गाडी रद्द करण्यात आली होती. पाठीमागून येणाऱ्या वांद्रे ते गोरखपूरपर्यंत धावणारी अंत्योदय एक्स्प्रेस सुटणार होती. या ट्रेनसाठी बुकिंग किंवा रिझर्व्हेशन करण्याची गरज नसते . या कारणामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आणि लोक जखमी झाले. म्हणून मध्य रेल्वेने 8 नोव्हेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानकांवर गर्दी कमी होण्यास मदत होईल. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय दृष्ट्या आजारी प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. यासोबतच पश्चिम रेल्वेनेही प्लॅटफॉर्म तिकीटाची विक्री थोड्या काळासाठी बंद केली आहे .मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना आणि सूरत या स्थानकांवर तिकिटांची विक्री थांबवण्यात आलेली आहे.
रेल्वे प्रवाशांना विनंती
उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मुंबईहून जास्त रेल्वे गाड्या धावत आहेत .अशाच एका गाडीमध्ये चढताना प्रवाशांचा गोंधळ उडाला त्यामुळे हि दुर्घटना झाली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षिततेची काळजी घेण्याची विनंती केली आहे, तसेच प्रत्येक प्रवाशाने आवश्यक काळजी घेऊन प्रवास करावा, असे देखील आवाहन केले आहे.