हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही वर्षात मुंबईतील वाहतूक आणि रस्ते बांधणीत अनेक नवनवीन बदल झाले आहेत. मोठमोठ्या ब्रिजच्या निर्मितीमुळे वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटली आहे. तसेच प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचत आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंकचे २९ टक्के काम पूर्ण झाले असून, आता वर्सोवा बाजूनेही समुद्रातील मार्गावर स्पॅन उभारणीचे काम सुरू झाले आहे. वांद्रे वर्सोवा सी लिंक मुळे पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी मिटणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मोठं महत्व आहे.
सी लिंक १७.७ किमी लांबीचा – Bandra Versova Sea Link
वांद्रे वर्सोवा सी लिंक १७.७ किमी लांबीचा आहे. या सागरी मार्गावर एकूण ८ मार्गिका बांधल्या जातील. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये असेल. सध्या तरी त्याठिकाणी समुद्रात रस्त्याचे काम सुरू झाले आहे. आत्तापर्यंत कार्टर रोडबाजूने 12 स्पॅन उभारणीचे काम पूर्ण केले आहे. तर वर्सोवा बाजूने स्पॅन उभारणीला पंधरा दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दोन स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र सध्या मुंबईत पावसाने थैमान घातल्याने हे काम तात्पुरतं काही दिवस बंद आहे. मात्र, त्याच वेळी वर्सोवा, कार्टर रोड आणि जुहू बाजूच्या कनेक्टरचे जमिनीवरील काम सुरू राहील, असं बोललं जातंय.
वांद्रे वर्सोवा सी लिंकच्या प्रकल्पाला (Bandra Versova Sea Link) खरं तर 2019 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र मधल्या काळात कोरोना आल्याने आणि संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्याने या प्रकल्पाचे काम रखडलं होत. सर्व जगच त्यावेळी ठप्प झाल्याने कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडले होते. परिणामी या प्रकल्पाचे काम रखडले होते. आता मात्र पुन्हा एकदा वांद्रे वर्सोवा सी लिंकच्या प्रकल्पाला गती आली आहे. जवळपास २९% काम हे पूर्ण झालं असून मे 2028 पर्यंत हा सागरी रस्ता मुंबईकरांच्या सेवेत येईल. सद्यस्थितीत बांद्रापासून वर्सोव्हापर्यंतच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागतात, परंतु एकदा हा वांद्रे वर्सोवा सी लिंक सुरु झाला कि मग हाच प्रवास 20-30 मिनिटांत पूर्ण होईल.




