सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
राज्यासह परराज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या चरणी भाविक मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात. या मंदिरातील देणगी स्वरूपातील पैशाची व दागिण्यांची दर महिन्याच्या ठराविक दिवशी मोजणी केली जाते. सोमवारी ट्रस्टी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होती. यावेळी बँकेचा एक कर्मचारी वारंवार मंदिराच्या आत- बाहेर करत होता. कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे तो पैसे चोरी करत असल्याचा संशय ट्रस्टींना आला. यानंतर ट्रस्टींनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे दानपेटीतील काही रोकड व दागिने आढळून आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मांढरदेव येथील काळूबाईच्या मंदिरात असणाऱ्या दान पेटीतील दान करण्यात आलेल्या रकमेची व दागदागिन्यांची मोजदाद दर महिन्याला बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. ट्रस्टींच्या समोर बँकेचे तीन कर्मचारी पैसे मोजण्याचे काम करतात. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे पैसे मोजण्याचे काम पोलिस आणि सुरू असताना कदम नावाचा कर्मचारी दोन ते तीनवेळा आत बाहेर करत असल्याचे ट्रस्टींच्या लक्षात आले.
यावेळी या कर्मचाऱ्याने चोरी केल्याचा संशय आल्याने ट्रस्टींनी त्याच्याकडे चौकशी करून व वाहनाची झाडाझडती केली असता. त्याच्या गाडीत दीड लाखांची रोकड व सोन्याचे दागिने आढळून आले. यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कर्मचाऱ्याने चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित कर्मचाऱ्याने यापूर्वीही दान पेटीतील रक्कम व दागिने चोरले आहेत का? चोरले असतील तर ते किती? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.