औरंगाबाद | बँकांच्या खासगीकरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या संपाला बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चार दिवसांनंतर बुधवारी बँकांचे कामकाज सुरू झाले आणि नागरिकांनी बँकांमध्ये एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सरकारने आयबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे १५ व १६ मार्च रोजी संप पुकारण्यात आला. शहरातील विविध बँकांसमोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना बँकांचे खासगीकरण झाल्यास काय परिणाम होईल, यासंदर्भात माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप केले. दोन दिवसांत दहा हजार पत्रकांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.
संघटनांनी बँकिंगच्या कामात सुधारणा सूचविल्या आहेत. ज्या अमलात आणल्या तर बँका नफ्यात येईल, सामान्यांच्या हिताचे रक्षणही होण्यास मदत होईल. थकीत कर्जदारांची यादी जाहीर करा, कर्ज थकीत केले तर तो गुन्हा ठरावा, थकीत कर्जदारांना निवडणूक लढविण्यास बंदी करावी, आदी सूचना केल्याची माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने दिली.
आॅनलाईन व्यवहार, पण चेक पडून
चार दिवस बँका बंद राहिल्याने नागरिकांनी आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्यावर भर दिला, मात्र जे व्यवहार चेकनेच होतात ते ठप्प राहिले. बँकांच्या एटीएममधील बॉक्समध्ये चेक पडून होते, ते चेक आता क्लीअरिंगला जातील. संपाच्या दोन दिवसांत कोट्यवधींचे बँक व्यवहार ठप्प राहिल्याने अनेकांची अडचण झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.