कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील शेणोली येथे भरदुपारी बँक आॅफ महाराष्ट्र च्या शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी शस्त्रांचा धाक दाखवून आठ लाखांची रक्कम लुटण्यात चोरटे यशस्वी झाले असल्याचे समजत आहे. चोरट्यांनी बँकेतील कर्मचार्यांना बंदुकीचा धाक दाखवला तसेच गोळीबारही केला. त्यानंतर बँकेतील कर्मचार्यांनी सर्व रक्कम चोरट्यांकडे सुपुर्द केली. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे शेणोली आणि परिसरात भीतीचे वातावरण झाले असून नागरिकांमधे खबराट पसरली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, कराड तासगाव रोडवर असणाऱ्या शेणोली येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेवर भर दुपारी दोन चारचाकी गाडीतून आलेल्या चोरटयांनी बँकेत प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करत कॅश काउंटर सहीत पैसे भरणा करण्यास आलेल्या लोकांकडून त्यांच्या जवळील जवळपास तेवीस लाखांची रक्कम व गहाण व तारण ठेवलेले सोने लुटून पोबारा केला. त्यातील एक गाडी कराडच्या दिशेने तर दुसरी गाडी तासगाव च्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांकडून समजत आहे. तेवीस लाखांची रक्कम व गहाण व तारण ठेवलेले सोने चोरांनी लुटले असलेची माहिती मिळते आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचे कृत्य सीसीटिव्हीत कैद झाले असून त्याआधारे आम्ही चोरट्यांना शोधून काढू असे सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले.