मथुरेतील मंदिरात चेंगराचेंगरी; 2 जणांचा मृत्यू, 50 हुन अधिक बेशुद्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच उत्तर प्रदेशमधील मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मंदिरातील प्रसिद्ध मंगला आरतीदरम्यान ही घटना घडली. या घटनेत २ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर बांके बिहारी मंदिरात मंगला आरतीवेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या क्षमतेपेक्षा जास्त भाविक असल्याने उपस्थित भाविकांना गुदमरायला लागले. या चेंगरा चेंगरीमध्ये ५० हुन अधिक जण बेशुद्ध पडले. तर २ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नोएडा येथील निर्मला देवी आणि जबलपूर येथील वृंदावन वासी राजकुमार यांचा समावेश आहे. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलिवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

दरम्यान, कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मथुरा-वृंदावनमधील सर्व हॉटेल-लॉज आणि आश्रम भरगच्च भरले होते. राहण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे अनेक भाविकांनी फुटपाथवर झोपून रात्र काढली. जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुमारे ५० लाख भाविक मथुरेत दाखल झाले होते. त्यातच या घटनेने सणाला गालबोट लागले.