मुंबई प्रतिनिधी | बाजाराची जोरदार मागणी व सरकारच्या दबावात, अखेर रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचा हफ्ता कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदरात (रेपोरेट) १८ महिन्यानंतर पहिल्यांदा पाव टक्का कपातीचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे वाहन कर्जपासून ते गृह कर्ज व व्यावसायिक कर्जापासून ते वैयक्तिक कर्जावरील हफ्ता कमी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील असलेले रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी पहिल्यांदाच द्विमासिक पतधोरण जाहीर केले. हे धोरण जाहीर करताना त्यांनी आधीचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याबाबत असलेली नाराजी रेपोरेटमध्ये कपातीद्वारे दूर केली.,
रिझर्व्ह बँकेने याआधी ऑगस्ट २०१८ मध्ये रेपोरेट मध्ये पाव टक्का घट केली होती. त्यानंतर मागीलवर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात बँकेने सलग दोन वेळा रेपोदरात वाढ केली होती. त्याचा बाजारातील रोख तरलतेवर परिणाम झाला. बाजारात खेळते भांडवल नसल्याने उद्योग संकटात होते. यामुळे रिझर्व्ह बँकेवर दर कमी करण्यासाठी दबाव होता.
बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जावरील हफ्ता कमी होणार आहे. १२ टक्के व्याजदरानुसार १ ते ५ लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावरील हफ्ता ११ ते ५९ रुपये कमी होणार आहे. ८.८० टक्क्यांच्या २० ते ८० लाख रुपयांच्या गृह कर्जावरील हफ्ता ३१८ ते १२८८ रुपये कमी होईल. त्याचवेळी ३ ते १० लाख रुपयांच्या ९.३० टक्क्यानुसार वाहन कर्जावरील हफ्ता ३६ ते २१८ रुपये कमी होणार आहे.