हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. चिंचवड येथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप याना उमेदवारी देण्यात आली मात्र कसब्यात मात्र भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबाबाहेर उमेदवारी गेल्यामुळे पक्षात नाराजीची चर्चा सुरु आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे कसब्यात लागलेला बॅनर..
कसबा पेठ मतदारसंघात काही बॅनर्स झळकले आहेत. यामध्ये लिहिलं आहे की, कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का…??? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार” . त्यामुळे ब्राह्मण समाज भाजपवर नाराज आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कसब्यात जवळपास 25 ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहे. हे बॅनर्स कुणी लावले? असा प्रश्नही आता चर्चेत आला आहे. या बॅनर्सवर कुणाचंही नाव नाही. पण पक्षातीलच नाराजांनी हे बॅनर्स लावले असण्याची शक्यता आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचे त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली. खरं तर त्याठिकाणी मेधा कुलकर्णी या विद्यमान आमदार होत्या, मात्र पक्षाने त्यांचं तिकीट कापलं. त्यांनतर आता मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त पदावर त्यांच्या कुटुंबाबाहेर उमेदवारी देण्यात आली आहे. आता बापट यांचा नंबर आहे का? असा सवाल केला गेला आहे.