पुणे । जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत, अशी आक्रमक मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा निर्णय हा शिवद्रोही सरकारचा दुर्दैवी निर्णय आहे उलट शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवप्रेमींना महाराष्ट्र सरकार पोलिसांकडून प्रचंड त्रास देत आहे, असं म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केलीय.
साहित्य संमेलनाचा 50 लाख रुपये अनुदान राज्यातील जनतेच्या आरोग्यावर खर्च करावे. तसेच शरद पवार, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड उपस्थित असणारा चांदणी चौकातील (20 तारखेला) 1000 लोकांचा ‘वशाटोत्सव’ सुद्धा महाराष्ट्र सरकार आणि पुणे पोलिसांनी रद्द करावा, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. कारण त्या तिथे ठिकाणी सुद्धा हजारो लोक जमणार आहेत. जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वशाट उत्सव आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत, अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे.
राज्यात 19 फेब्रुवारीनिमित्त शिवजयंतीचे हजारो कार्यक्रम होत असतात. शिवप्रेमी कार्यकर्ते शिवजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाचे हजारो कार्यक्रम आयोजित करतात. गावागावात व्याख्यान, पोवाडे, स्पर्धा, प्रबोधनाचे इतर कार्यक्रम हे लाखो रुपये खर्च करून आयोजित केले जातात. कार्यक्रम पत्रिकेपासून सभागृह आणि वक्त्याच्या मानधनात तोपर्यंत सगळे (बुकिंग) कार्यक्रम ठरलेले असताना सरकारने अचानक शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा आदेश काढला. त्यामुळे हजारो शिवप्रेमींचे लाखो रुपये पाण्यात गेले.
नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार 50 लाख रुपये देणार आहे. छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असल्यामुळे त्यांनी नाशिक मनपा आणि जिल्हा परिषद यांना प्रत्येकी 50 आणि 25 लाख रुपयांची दबाव टाकून मागणी केलेली आहे. “ज्या महात्मा फुलेंनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भटा-बामणांचे संमेलन आहे, इथे आमच्या लोकांचे प्रश्न सुटत नाही, त्यांची चर्चा होत नाही.
अशा संमेलनाला आम्ही जात नाहीत,” अशी भूमिका घेतली होती, अशा साहित्य संमेलनाला ते आमंत्रण असूनसुद्धा गेले नाहीत.” त्याच महात्मा फुले यांच्या नावाने ‘समता परिषद’ काढून छगन भुजबळ महाराष्ट्रात काम करतात आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष केल्यानंतर “माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद आहे,” अशी जाहीर चर्चा करतात, हा फुलेंच्या विचारांचा पराभव आहे. मात्र आम्ही शिवप्रेमी कार्यकर्ते फुले यांच्या विचारांचा पराभव होऊ देणार नाहीत. उलट गावागावात जाऊन शिवराय-फुले- शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करू…!! म्हणून महाराष्ट्र सरकारने कोविड 19 अर्थात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करावे, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.