बारामतीत मतदानाच्या रात्रीस खेळ चाले; पैसे वाटप ते शिवीगाळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार विरुद्ध पवार, नणंद विरुद्ध भावजयी, घड्याळ विरुद्ध तुतारी…महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉइंट जिकड शिफ्ट झाला होता त्या बारामती लोकसभेचं मतदान अखेर पार पडलं. काट्याने काटा काढावा तसा अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या प्रचाराला धार होती. परवा प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रॅक्टिस मॅच संपून आता प्रतीक्षा होती ती फायनल मॅचची. 7 मे 2024. या दिवशी पवारांच्या राजकारणाचा नवा अध्याय लिहिला जाणार हे तर फिक्स होतं. पण मतदानाच्या आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदान पार पडलं त्या 7 तारखेला बारामती मतदारसंघाला मोठा मेलो ड्रामा पाहायला मिळाला. पवार साहेबांची प्रचार सभांच्या दगदगीमुळे तब्येत खालावली, रोहित पवार यांना भर सभेत रडू कोसळलं, निवडणुकीच्या मध्यरात्री पिडीसीसी बँकेतून आणि अनेक ठिकाणी अजित पवार गटाकडून पैसे वाटप करण्याचे डझनवर व्हिडिओ रोहित पवारांनी व्हायरल केले, अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे यांचा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्यानं बरंच राजकारण तापलं. मतदानाच्या दिवशी आपल्या आईंना सोबत आणून मेरे पास मेरी मा है, असं म्हणत अजितदादांनी फिल्मी डायलॉगबाजी केली. तर सुप्रिया ताईंनी मतदानाच्या दिवशीच अजितदादांच्या घरी भेट देत अनेकांना संभ्रमात टाकलं… थोडक्यात बारामती जिंकण्यासाठी यंदा दोन्ही पवारांचा भुगा पडला… आणि त्यात मतदारांचं वांग्याचं भरीत होऊन गेलं. मागच्या दोन दिवसातील रोहित पवारांच्या इमोशनल ड्रामा पासून अजितदादांच्या मॅच फिक्सिंगनं मतदारांच्या डोक्याला कसा शॉट बसलाय? प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी एका मागून एक घडलेल्या घटनांमुळे बारामतीत तुतारीच वाजणार. असं लोकं आत्मविश्वासाने का सांगतायत? त्याचंच केलेलं हे डिकोडिंग…

बारामतीच्या निवडणुकीचा कालचा दिवस बराच वादळी ठरला. तुतारी की घड्याळ बारामतीकर कुणाच्या डोक्यावर हात ठेवणार? याचा थोडासा अंदाज देखील परवापर्यंत येत नव्हता. पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी आणि त्याच्या दोन दिवस आधी अशा काही गोष्टी एकामागून एक घडल्या की बारामतीत यंदा तुतारीच वाजणार, असं आता सगळेजणच बोलू लागलेत. महायुतीनं ताकद लावूनही घड्याळापेक्षा तुतारीच शेवटच्या दिवसात वरचढ ठरली. त्याची जी काही कारण सांगता येतात.

Baramati Lok Sabha : बारामतीत मतदानाच्या रात्रीस खेळ चाले, पैसे वाटप ते शिवीगाळ

त्यातलं पहिलं कारण म्हणजे मतदानाची फायनल टक्केवारी….. अजित पवार वर्सेस शरद पवार अशी ऐतिहासिक निवडणूक असताना बारामती यंदा मतदानाचा टक्का हा कमालीचा वाढेल असं सगळ्यांनाच वाटत असताना बारामतीत मात्र हा टक्का पुरता घटला. काल पार पडलेल्या महाराष्ट्रातील अकरा लोकसभा निवडणुकांपैकी बारामतीत अवघ्या 47.84% इतक्या अल्पशा मतदानाच्या टक्केवारीची नोंद झाली. आता याचा आणि तुतारी जिंकण्याचा काय संबंध? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर सांगतो. बारामती लोकसभेत सर्वाधिक मतदान बारामती विधानसभेचं नोंदवण्यात आलं. दादा स्वतः या मतदारसंघाचे आमदार असल्याने आणि गाव पातळीवर त्यांचा होल्ड असल्याने इथून त्यांना बरीच मदत होईल, असं चित्र दिसतंय. पण मतदान फिरवणारा मतदारसंघ म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या खडकवासला मतदारसंघात अवघ्या 50 टक्के मतदानाची नोंद झाली. आणि हीच दादांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कारण इथून भाजपचे भीमराव तापकीर आमदार असल्याने घड्याळाला जास्तीत जास्त मतदानाची अपेक्षा होती. पण भाजपचे पारंपारिक मतदारांनी सुनेत्राताईंच्या उमेदवारीकडे पाठ फिरवल्याचं एकूणच या आकडेवारीवरून दिसतं. यासोबतच जिथून विजयबापू शिवतारे यांनी झालं गेलं विसरून अजित दादांच्या पाठीशी ताकद लावली होती त्या पुरंदर विधानसभेतही अवघ 48% मतदान नोंदवण्यात आलंय. थोडक्यात अजित दादांना जिथून महायुतीचे नेते सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करणार होते. त्याच ठिकाणी मतदान घसरल्याने दादांना अपेक्षित असा रिजल्ट नक्कीच बघायला भेटणार नाही. एवढंच नाही तर खडकवासल्यासारख्या शहरी पट्टयात आणि संजय जगताप यांच्यामुळे इंडापुरातील हेच मतदान तुतारीला होण्याचे चान्सेस जास्त आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे मतदानाच्या आदल्या रात्रीच अजित पवार गटावर ठिकठिकाणी पैसे वाटल्याचा झालेला आरोप… रोहित पवारांनी मतदानाच्या मध्यरात्रीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात पिडीसिसी बँक मध्यरात्री सुरू असून जिथून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेची गंभीरपणे दखल घेत सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली. यासोबतच बारामतीत जागोजागी पैसे वाटण्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की, मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच अजितदादांना निवडून येण्यासाठी पैसे वाटण्याची गरज पडतेय, असं नरेटीव शरद पवार गटाकडून तयार केलं गेलं. सोशल मीडियावरून याच्या पोस्ट वायरल होऊ लागल्या. पैसे वाटणारे…पैसे घेणारे…यांचे स्पष्ट चेहरे व्हिडिओतून दिसत असल्याने अजित पवार गटाला यावरच स्पष्टीकरण द्यायला अडचणही झाली. हे सगळं अजित पवारांवर मतदानाच्या दिवशीच बूमरँग झालं. अजित पवार गटाची बाजू पडती आहे, असा इनडायरेक्ट मेसेजच यातून गेल्यानं तुतारीसाठी ही गोष्ट फायद्याची ठरली…

तिसरी आणि सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे आमदार दत्तामामा भरणे यांनी केलेली शिवीगाळ… इंदापुरातील एका मतदान केंद्रावर अजित पवार गटाचे आमदार दत्तामामा भरणे यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा व्हिडिओ मतदान पार पडत असतानाच समोर आला. तुम्हाला निवडणुकीनंतर माझ्याशिवाय कोणी नाही, असं म्हणत अनेकदा शिवीगाळही केली, हा प्रकार रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावरून सर्वत्र पसरवला. त्यांनी ट्विट करत म्हटलं, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही, अशा शब्दात रोहित पवारांनी भरणेंना टारगेट करून मतदानाच्या दिवशीच अजितदादांची अडचण वाढवली. इंदापूरात आधीच हर्षवर्धन पाटील हे अजितदादांचं काम करतील असं दिसत असलं तरी त्यांच्यातलं वैर पुऱ्या जिल्ह्याला ठावूक आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी आतून तुतारीचं काम केलं असेल तर भरणेंच्या या व्हायरल व्हिडिओनं इंदापूरात घड्याळाच्या काट्यांना निवडणूक अवघड गेली असणार. थोडक्यात ज्या इंदापुरातून अजितदादांना सर्वाधिक लीड मिळण्याचे चान्सेस वाटत होते. तिथंच हा एक व्हिडिओ घड्याळाचा उलटा गेम करू शकतो.

चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुतारीची मतदारसंघातील सौम्य लाट… प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बारामतीतील पोलींग बूथवरचं दृश्य पाहिलं तर काही गोष्टी ठळकपणे आढळून आल्या. अनेक वयस्कर, वृध्द आणि तरुण नव मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी हजेरी लावली होती. अनेकांशी बोलण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काहीही झालं तरी आम्ही तुतारीलाच मतदान करणार असं म्हणणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. अजित दादांनी जे काही केलं ते आपल्याला पटलं नाही…आम्ही काहीही झालं तरी भाजपला मतदान करणार नाही… शरद पवारांच्या सोबत उतार वयात असं घडायला नको होतं. अशा चर्चा निवडणुकीच्या आधी आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीही बारामतीत पाहायला मिळाल्या. कार्यकर्त्यांचं, कार्यकर्त्यांनी मॅनेज केलेल्या एका समुहाचं मतदान सोडलं तर सहानुभूतीवर मतदान करणाऱ्यांची संख्या यंदा लक्षणीय वाटली. आणि हीच बाब सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडणारी आहे.

थोडक्यात काय तर पैसे वाटल्याच्या घटना, शिवीगाळ, मतदानाची घटलेली टक्केवारी आणि शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर काल बारामतीत तुतारी जोरात वाजलीय, असं म्हणायला बराच स्कोप मिळतो. बारामतीतला कालचा सावळा गोंधळ पाहता घड्याळावर तुतारी वरचढ ठरलीय, असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.