हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रुहत बेंगलुरु महानगर पालीकेने (BBMP), बकरी ईद म्हणून ओळखल्या जाणार्या ईद-अल-अधा या आगामी सणाच्या तयारीसाठी सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कुर्बानीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. याबाबत अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आली आहे.
BBMP च्या या घोषणेनंतर रस्ते, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, उद्याने आणि प्रार्थनास्थळांच्या अंतर्गत आणि बाहेर प्राण्यांची कत्तल करता येणार नाही. BBMP ने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, या धार्मिक उत्सवादरम्यान केवळ अधिकृत वधगृहांनाच प्राण्यांची कत्तल करण्याची परवानगी असेल. तसेच जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर व्यक्तीवर किंवा संस्थांवर कर्नाटक राज्य प्राणी बलिदान कायदा 1959 अंतर्गत कारवाई केली जाईल.
कर्नाटक राज्य प्राणी बलिदान कायदा 1959 च्या कलम 3 नुसार सदर गुन्हेगारांवर खटला चालवला जाऊ शकतो. त्यानुसार 6 महिने कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. BBMP ने एका निवेदनात म्हटले आहे की, या गुन्ह्यासाठी कलम 429 अंतर्गत 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे. आयपीसी बीबीएमपीचे पशुसंवर्धन सहसंचालक डॉ. के पी रविकुमार यांनी म्हंटल की, ज्या व्यक्तींनी कायदा मोडला आहे त्यांना भारतीय दंड संहिता आणि कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ स्लॉटर अँड प्रिझर्वेशन ऑफ कॅटल ऍक्ट 2020 च्या संबंधित कलमांनुसार कायदेशीर परिणाम भोगावे लागतील.
बकरीदच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आलेली बंदी ही अलीकडची घटना नाही, यापूर्वीही आम्ही सार्वजनिक रस्त्यावर जनावरांच्या कत्तलीवर बंदी घातली होती. स्वच्छता राखणे ही एक प्रमुख चिंता आहे आणि कत्तलीसाठी गायी, गुरेढोरे, वासरे आणि बैल यांची सर्व वयोगटातील वाहतूक करणे हा दंडनीय गुन्हा आहे,’ असेही बीबीएमपीने स्पष्ट केले आहे.