औरंगाबाद – मराठवाड्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून विविध ठिकाणी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच 20 ते 23 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यासह राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह पाऊस येईल, अशा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
औरंगबाद शहरात दिवसभर उकाडा, सायंकाळी पाऊस
औरंगाबाद शहरात आज अनेक ठिकाणी ऊन आणि प्रचंड उकाडा जाणवला. काही भागात काही काळ ढगांचे सावट जाणवले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातही पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला यामुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आजच्या पावसाच्या सुरुवातीसह पुढील तीन दिवस काही भागात तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात कुठे, कधी यलो अलर्ट ?
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 22 सप्टेंबर रोजी बीड, परभणी, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसण्याचे संकेत अर्थात यलो अलर्ट देण्यात आला आहे. ही माहिती डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.