हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वांकडे स्मार्टफोन,अँड्राईड मोबाईल असल्याने ते WhatsApp वापरतातच. आता युजर्सनी थोडी जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. WhatsApp हे स्वत:चे सर्व प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी वारंवार अपडेट करत राहते. त्यावेळी वापरकर्त्यांनी सावध राहायला हवे. कारण, हॅकर्सनी WhatsApp वरून फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे.
‘हॅलो मम’ किंवा ‘हॅलो डॅड’ बोलून घोटाळ्याची सुरवात अनौपचारिक पद्धतीने झाली आहे. युनायटेड किंगडममधील सायबर गुन्हेगार अशा प्रकारचे मेसेज पाठवून पालकांची फसवणूक करीत आहेत. सायबर गुन्हेगारांनी या नव्या पर्यायातून अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे.मुलाला पैशांची गरज असल्याचे समजून पालकदेखील तत्काळ पैसे पाठवितात. मात्र, समोरील ओळखीचा कोणीतरी एवढ्या तत्काळ पैसे मागतोय, पण त्याने कॉल का केला नाही, याची खात्री सर्वांनी करायला हवी.
आपल्या मुलाला पैसे हवेत आहेत तर तो कॉल का करत नाही, याचाही पालकांनी विचार करावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.WhatsApp वापरणाऱ्यांनी त्यांचा खरा मुलगा, मुलगी किंवा इतर कोणीतरी ओळखीचीच व्यक्ती पैसे मागतेय का, त्याला खरीच पैशांची गरज आहे का, याची खातरजमा केल्याशिवाय पैसे पाठवू नये, असेही आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. काहीच खात्री न करता, तुम्ही पैसे पाठविल्यास काही सेकंदात तुमचा बॅंक बॅलन्स शून्य होऊ शकतो, असा सावधानतेचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
हॅकर्स तुमच्या चॅट बॉक्सवर एक ओळखीची व्यक्ती म्हणून पॉपअप मेसेज पाठवतात. तो तुमचा भाऊ, बहीण, चुलत भाऊ, मित्र किंवा नातेवाईक असू शकतो. तो लगेच पैशांची मदत मागू शकतो. त्याला पैशाची गरज आहे म्हणून आपण लगेचच ऑनलाइन पैसे पाठवितो. परंतु, काही सेकंदात समोरील हॅकर्स ते पैसे लंपास करतात. त्यामुळे सर्वांनी अशा मेसेजची कॉल करून खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
WhatsApp हे अलीकडे अपडेट झाले असून त्यावरून आपण इतरांना पेमेंट करू शकतो. त्यामुळे सायबर गुन्हेगार आता WhatsApp वर बोगस मेसेज पाठवून फसवणूक करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पैशांची मागणी करणाऱ्याबद्दल अगोदर खात्री करावी, जेणेकरून फसवणूक होणार नाही अशी माहिती सूरज निंबाळकर, पोलिस उपनिरीक्षक, सायबर, सोलापूर ग्रामीण यांनी दिली आहे.