औरंगाबाद – अपघात विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी किरकोळ कारणामुळे एका डॉक्टरला मारहाण केल्याची घटना काल रात्री साडेदहा वाजता घडली. या घटनेमुळे घाटी रुग्णालयातील सर्व डॉक्टर एकत्र होत काम न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ घाटीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली
अपघात विभागाच्या वॉर्ड क्रमांक 13 मध्ये नसीर हुसेन मोहम्मद (वय.५०) राहणार शहानूरवाडी उस्मानपुरा या रुग्णावर उपचार सुरू आहेत. राऊंडसाठी आलेल्या रात्रपाळीच्या डॉक्टरने रुग्णांची पाहणी करत असताना किरकोळ कारणावरून रुग्णाने डॉक्टरांशी वाद घातला. यावेळी सोबत असलेल्या एका तरुणाने डॉक्टरला मारहाण केली. त्यानंतर निवासी डॉक्टर अपघात विभागासमोर जमा झाले.
घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता अपघात विभागासमोर दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांच्या समस्या जाणून घेत डॉक्टरांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. घटनास्थळी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार दाखल झाले. उशिरापर्यंत गुन्ह्याची प्रक्रिया सुरू होती.