निवडणूक : पाटण नगरपंचायतीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

पाटण | येथील नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दि.1 रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी दिली.

नगरपंचायत निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसह,प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यानंतर निवडणुकीचा एक एक टप्पा पार पडत असून दि.१ ते ७ डिसेंबर असा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा कालावधी देण्यात आला आहे.उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

मात्र शनिवार दि. ४ व रविवार दि.५ रोजी सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन स्विकारले जाणार नाहीत. दि.८ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज माघारीसाठी दि.१३ रोजी दुपारी तीनपर्यंत वेळ देण्यात आली आहे. दि.२१ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे तर दि.२२ रोजी मतमोजणी व निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

You might also like