हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वीच यवतमाळ याठिकाणी मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोन शिक्षकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता पुन्हा एकदा याच घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील वांद्रेत झाली आहे. या ठिकाणी सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचारी महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नेमके काय घडले?
सध्या राज्य मागासवर्ग आयोग मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करत आहे. मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या मुंबईत देखील सर्वेक्षणाचे जोरदार काम सुरू आहे. हेच सर्वेक्षण करण्यासाठी एक कर्मचारी महिला वांद्रे परिसरात गेली होती. मात्र या महिलेला सोसायटीतील रहिवाशांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामुळे महिलेला दुखापत देखील झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अदिती चिपकर असे कर्मचारी महिलेचे नाव आहे. त्या एक फेब्रुवारी रोजी वांद्रे पश्चिम येथील एका निवासी इमारतीमध्ये सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. याचवेळी इमारतीतील रहिवाशांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच माहिती देण्यास नकार दिला. हा एवढा वाढला की , रहिवाशांनी कर्मचारी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच करून न थांबता त्यांना मारहाण केली. या सर्व घटनेनंतर अदिती चिपकर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलीस चौकशी करत आहेत.