कोटींच्या अपहार प्रकरणातील फरार मुख्याधिकाऱ्यास बेड्या; आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : माजलगाव नगरपालिकेत 4 कोटी 14 लाखाच्या अपहार प्रकरणी चक्क तीन मुख्याधिकार्‍यांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीनही मुख्याधिकारी फरार होते. रविवारी (दि.2) पहाटेच्या सुमारास सोलापुर जिल्ह्यातील कामटी येथील घरातून एका मुख्याधिकार्‍यास बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या अर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. 

लक्ष्मण राठोड असे पकडलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. दि.3 मे 2019 ला पालिकेची मंत्रालयीन चौकशी लागली होती. त्या चौकशीतून समितीने दिलेल्या अहवालात 14 व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत सर्वच वित्तीय नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब नमूद केली आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत होत असलेल्या अनियमिततेबाबत त्या-त्या वेळच्या मुख्याधिकाऱ्यांनी म्हणजेच तत्कालीन बी.सी.गावित, लक्ष्मण राठोड व हरिकल्याण येलगट्टे यांनी शासनास अहवाल देवून याची माहिती देणे अनिवार्य होते. परंतू पुर्ण माहितीने अनुज्ञये नसलेल्या बाबीसाठीच खर्च करून निधीचा अपहार करण्यात आला तो ही शहरातील एच.डी.एफ.सी. बॅकेच्या खात्यावरून. या सर्व बाबी मुख्याधिकारी विवेक जॉन्सन यानी कायदेशीर मार्गदर्शन वरिष्ठांकडून घेत दि.24 मंगळवारी पहाटे 3 वा. मुख्याधिकारी बी.सी.गावित, लक्ष्मण राठोड, हरिकल्याण येलगट्टे, तत्कालीन लेखापाल अशोक भिमराव कुलकर्णी (वांगीकर), आनंद लिंबाजी हजारे, सुर्यकांत ज्ञानोबा सुर्यवंशी, कैलास रांजवण यांच्या विरूध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील फरार असणार्‍या लक्ष्मण राठोड यांना सोलापुर जिल्ह्यातील कामटी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकप्रमुख सपोनि.एन.ए.केळे, मुंजबा कुवारे, राजु पठाण, सुंदर भिषे, सिद्दीकी, शिंदे, चालक प्रताप घोडके यांनी केली. राठोड यांना पोनि.प्रशांत शिंदे यांच्या स्वाधीन केले असून ते प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Leave a Comment