नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्सला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर इंग्लंड संघाच्या कसोटी कर्णधारपदासाठी स्टोक्सचे नाव आघाडीवर होते. यानंतर आज अखेर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सच्या नावावर नियमित कसोटी कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.
बेन स्टोक्स सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. पण जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजअगोदर स्टोक्स फिट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्टोक्सला कर्णधार केल्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डापुढे टेस्ट टीमचा उपकर्णधार कोण असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉलेने वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या नेतृत्वाने सगळ्यांना प्रभावित केले होते. त्यामुळे त्याची इंग्लंड क्रिकेट टेस्ट टीमचा उपकर्णधार म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे मात्र त्या अगोदर त्याने बॅटर म्हणून स्वत:ला सिद्ध करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या लिमिटेड ओव्हरच्या सीरिजमध्ये बेन स्टोक्सला इंग्लंडचा कर्णधार करण्यात आले होते. त्या सिरीजमध्ये टीमचे बहुतेक खेळाडू कोरोनाग्रस्त असल्यामुळे खेळण्यासाठी उपलब्ध नव्हते. तरीदेखील इंग्लंडच्या टीमने बेन स्टोक्सच्या नेतृत्वात ती सिरीज 3-0 ने जिंकली होती.
बेन स्टोक्सची कारकीर्द
बेन स्टोक्सने 2013 साली कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याची फेब्रुवारी 2017 मध्ये कसोटी उपकर्णधारपदी नियुक्तीही करण्यात आली होती. त्याने आत्तापर्यंत 79 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 35.89 च्या सरासरीने 5061 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 174 विकेट्स देखील घेतल्या आहेत.