हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अनेक ठिकाणच्या प्रवासासाठी लोकल ट्रेनला प्राधान्य दिले जाते. या ट्रेननंतर जास्त वापरली जाणारी सेवा म्हणजे बेस्ट (Brihanmumbai Electric Supply & Transport) होय. हि वाहतूक सेवा प्रवाशांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे, कारण कमी दर, एसी सुविधा आणि विस्तृत बसमार्गांमुळे बेस्ट सेवा चांगल्या रीतीने पुरवल्या जातात. पण आता बेस्ट उपक्रमाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कमी प्रतिसाद असलेल्या बस मार्गांवर सेवा बंद करणार असल्याचे सांगितले आहे.
20 पेक्षा जास्त मार्ग बंद करण्याचा विचार सुरू –
बेस्ट प्रशासनाने अल्प प्रतिसाद असलेल्या मार्गांवर बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण काही मार्गांवरील प्रवाशांची संख्या अत्यंत कमी आहे, तर काही मार्गांवर गर्दी वाढत आहे. यामुळे, रिकाम्या फिरणाऱ्या बस गाड्या अधिक गर्दी असलेल्या मार्गांवर वळवून प्रवाशांची सेवा सुधारण्याचा उद्देश आहे. सध्या 20 पेक्षा जास्त मार्ग बंद करण्याचा विचार सुरू आहे, आणि विशेषतः लांब अंतरावर असलेल्या मार्गांवर सेवा काही कालावधीसाठी बंद केली जाणार आहे .
प्रवाशांना चांगली सेवा –
बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे प्रमुख रेल्वे स्थानकं, मेट्रो स्टेशन आणि चौकांशी अधिक बस जोडल्या जातील, जेणेकरून जिथे अधिक मागणी आहे, तिथे प्रवाशांना चांगली सेवा मिळवता येणार आहे. बेस्टच्या बस सेवांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना काही अडचणी येऊ शकतात. सुमारे 2800 बसांचा संच असलेली बेस्ट सेवा, जवळपास 700 जुन्या बसांच्या भंगारात जाण्यामुळे आणखी कमी होणार आहे . यामुळे बस थांब्यांवर रांगा लांब होण्याची शक्यता आहे आणि प्रवाशांना अधिक वेळ थांबावे लागू शकते. प्रवाशांना त्यांचा बसमार्ग नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे, कारण बेस्ट लवकरच सेवा बंद होणाऱ्या मार्गांची अधिकृत यादी जाहीर करणार आहे.